नारायण नागबली पूजा

नारायण नागबली पूजा हि दोन विविध पूजांचे एकत्रीकरण आहे, ज्यात नारायण बळी पूजा व नागबली पूजा यांचा समावेश आहे.

Description

ह्या दोन्ही पूजा नारायण नागबली पूजा म्हणून एकत्रितच केल्या जातात. याला कारण असे आहे कि आपल्या पूर्वजांपैकी एखाद्या व्यक्तीची मृत्यू कुठल्या कारणाने झाली आहे हे निश्चित माहिती नसते, त्यामुळे असे पूर्वज मृत्युलोकात भटकतात आणि परिणामी पितृदोष भोगावा लागतो. त्यामुळे ह्या क्रियेमध्ये व्यक्तीचे नाव अथवा गोत्राचा उच्चार वर्ज्य आहे. हि पूजा त्र्यंबकेश्वर ज्योतिर्लिंग परिसरातच केली जाते, जिथे ब्रह्मा, विष्णू व महेश हे ज्योतिर्लिंगाच्या रूपाने जागृत आहेत. त्र्यंबकेश्वर, गोकर्ण महाबळेश्वर, गरुडेश्वर, हरिहरेश्वर (दक्षिण काशी), काशी (बनारस) ही स्थाने नारायण नागबली पूजा करण्यासाठी योग्य आहेत.

हे विधी आपल्या पितरांना गती मिळावी, या उद्देशाने केले जातात. त्यासाठी प्रत्येकाने आपल्या वार्षिक उत्पन्नाच्या १/१० (एक दशांश) खर्च करावा’, असे शास्त्र सांगते. आपल्या शक्तीनुसार खर्च केला तरी चालतो.

हे काम्यविधी आहेत. ते कोणालाही करता येतात. ज्यांचे आई-वडील हयात आहेत, त्यांनाही करता येतात.अविवाहित असणार्‍यांनाही एकट्याने हे विधी करता येतात. विवाहित असल्यास पती-पत्नीनी बसून हा विधी करावा. संततीप्राप्तीसाठी हा विधी करावयाचा असल्यास त्या दांपत्याने स्वतः हा विधी करावा. श्रवण नक्षत्र, पंचमी किंवा पुत्रदा एकादशी यांपैकी एका तिथीला केल्यास अधिक फायदा होतो.

स्त्रियांनी मासिक पाळीचे दिवस पाळणे अत्यंत जरुरीचे आहे. स्त्री गरोदर असल्यास ५ महिन्यांनंतर करू नये. घरात शुभकार्य म्हणजे लग्न, मौजीबंधन वगैरे काही झाले असल्यास अथवा घरात कोणी व्यक्ती मृत झाली असल्यास सदर विधी एक वर्षापर्यंत करू नयेत.

 विधी करण्याकरिता पुरुषांसाठी धोतर, उपरणे, बनियन तर महिलांकरिता साडी, झंपर (पोलके) व परकर इत्यादी नवीन वस्त्रे (काळा किंवा हिरवा रंग नसावा) लागतात. ही नवीन वस्त्रे नेसून विधी करावयाचा असतो. नंतर ती वस्त्रे दान करावी लागतात. तिसर्‍या दिवशी सुवर्ण नागाच्या (सव्वा ग्रॅम) एका प्रतिमेची पूजा करून दान करतात.

वरील विधी वेगवेगळे आहेत. नारायण-नागबली हा विधी तीन दिवसांचा असतो, वरील विधी करावयाचे असल्यास तीन दिवसांत करता येतात. स्वतंत्र एक दिवसाचा विधी करावयाचा असल्यासही करता येतो.

दुर्मरणाने मेलेल्या किंवा आत्महत्या केलेल्या माणसाचे क्रियाकर्मांतर न झाल्यामुळे त्याची प्रेतत्वनिवृत्ती झाली नसेल, तर त्याच्या लिंगदेहाला गती न मिळाल्यामुळे तो भटकत रहातो. असा लिंगदेह कुलाच्या संततीला प्रतिबंध करतो. तसेच कोणत्याही प्रकारे वंशजांना त्रास देतो. अशा लिंगदेहाला गती देण्यासाठी नारायणबली करावा लागतो. घराण्यात पूर्वी कोणत्याही पूर्वजाकडून नागाची हत्या झाली असल्यास त्या नागाला गती न मिळाल्यामुळे तो कुलाच्या संततीला प्रतिबंध करतो. तसेच अन्य प्रकारे वंशजांना त्रास देतो. या दोषाच्या निवारणासाठी नागबली करावा लागतो

विधी करण्यास योग्य काल

हा विधी करण्यासाठी कोणत्याही महिन्याची शुद्ध एकादशी व द्वादशी योग्य असते. एकादशीला अधिवास (देवतास्थापना) करून द्वादशीला श्राद्ध करावे. (हल्ली बहुतेक जण एकाच दिवशी विधी करतात.) संततीप्राप्तीसाठी हा विधी करावयाचा असल्यास दांपत्याने स्वतः हा विधी करावा. संतती प्राप्तीसाठी हा विधी करावयाचा असल्यास श्रवण नक्षत्र, पंचमी किंवा पुत्रदा एकादशी यांपैकी एका तिथीला केल्यास अधिक फायदा होतो.

पहिला दिवस : प्रथम तीर्थात स्नान करून नारायणबलीचा संकल्प करावा. दोन कलशांवर श्रीविष्णु व वैवस्वत यम यांच्या सुवर्णप्रतिमा स्थापून त्यांची षोडशोपचारे पूजा करावी. नंतर त्या कलशांच्या पूर्वेस दर्भाने एक रेघ ओढून दक्षिणाग्र कुश पसरावे. त्यावर शुन्धन्तां विष्णुरूपी प्रेतःया मंत्राने दहा वेळा उदक घ्यावे.

नंतर दक्षिणेस तोंड करून अपसव्याने विष्णुरूपी प्रेताचे ध्यान करावे. त्या पसरलेल्या कुशांवर मध, तूप व तीळ यांनी युक्त असे दहा पिंड काश्यपगोत्र अमुकप्रेत विष्णुदैवत अयं ते पिण्डःअसे म्हणून द्यावे. पिंडांची गंधादी उपचारांनी पूजा करून त्यांचे नदीत किंवा जलाशयात विसर्जन करावे. पूर्व दिवसाचा हा विधी झाला.

दुसरा दिवस : माध्यान्हकाली श्रीविष्णूची पूजा करावी. नंतर १, ३ किंवा ५ अशा विषम संख्येने ब्राह्मणांस बोलावून एकोदि्दष्ट विधीने त्या विष्णुरूपी प्रेताचे श्राद्ध करावे. हे श्राद्ध ब्राह्मणांच्या पादप्रक्षालनापासून तृप्तीप्रश्नापर्यंत मंत्ररहित करावे. श्रीविष्णु, ब्रह्मा, शिव व सपरिवार यम यांना नाममंत्रानी चार पिंड द्यावे. विष्णुरूपी प्रेतासाठी पाचवा पिंड द्यावा. पिंडपूजा करून त्यांचे विसर्जन झाल्यावर ब्राह्मणांना दक्षिणा द्यावी.

एका ब्राह्मणाला वस्त्रालंकार, गाय व सुवर्ण या वस्तू द्याव्यात. मग प्रेताला तिलांजली देण्याबद्दल ब्राह्मणांची प्रार्थना करावी. ब्राह्मणांनी कुश, तीळ व तुलसीपत्र यांनी युक्त असे उदक ओंजळीत घेऊन ते प्रेताला द्यावे. मग श्राद्धकर्त्याने स्नान करून भोजन करावे. या विधीने प्रेतात्म्याला स्वर्गप्राप्ती होते, असे सांगितले आहे.

स्मृतिग्रंथांमध्ये नारायणबली व नागबली हे एकाच कामनेसाठी सांगितले असल्याने दोन्ही विधी बरोबर करण्याची प्रथा आहे. नारायण-नागबली असे या विधीचे जोडनाव यामुळेच रूढ झाले आहे.

पुरोहितांच्‍या सन्‍मतीने सामुग्रीची व्यवस्था करावी.

Reviews

There are no reviews yet.

Be the first to review “नारायण नागबली पूजा”

Your email address will not be published. Required fields are marked *