त्रिपिंडी श्राद्ध

तीर्थाच्या ठिकाणी पितरांना उद्देशून जे श्राद्ध करतात, त्याला त्रिपिंडी श्राद्ध असे म्हणतात.

Description

आपल्याला माहीत नसलेल्या, आपल्याच वंशातील सद्गती न मिळालेल्या किंवा दुर्गतीला गेलेल्या व कुळातील लोकांना पीडा देणार्‍या पितरांना, त्यांचे प्रेतत्व दूर होऊन सद्गती मिळण्यासाठी, म्हणजेच भूमी, अंतरिक्ष व आकाश या तीन ठिकाणी असलेल्या आत्म्यांना मुक्ती देण्यासाठी, त्रिपिंडी करण्याची पद्धत आहे. एरव्ही केली जाणारी श्राद्धे ही एकाला उद्देशून किंवा वसु-रुद्र-आदित्य या श्राद्धदेवतांच्या पितृगणांतील पिता-पितामह-प्रपितामह या त्रयींना उद्देशून म्हणजेच तीन पिढ्यांपुरतीच मर्यादित असतात, पण त्रिपिंडी श्राद्धाने त्यापूर्वीच्या पिढ्यांतील पितरांनादेखील तृप्ती मिळते. प्रत्येक कुटुंबात हा विधी दर बारा वर्षांनी करावा, मात्र ज्या कुटुंबात पितृदोष अथवा पितरांमुळे होणारे त्रास असतात त्यांनी हा विधी दोष निवारणासाठी करावा.

विधी करण्यास योग्य काल:

त्रिपिंडी श्राद्धासाठी अष्टमी, एकादशी, चतुर्दशी, अमावास्या, पौर्णिमा या तिथी व पूर्ण पितृपक्ष योग्य असतो.

गुरु शुक्रास्त, गणेशोत्सव व शारदीय नवरात्र या कालावधीत हा विधी करू नये. तसेच कुटुंबात मंगलकार्य झाल्यावर वा अशुभ घटना घडल्यावर एक वर्षापर्यंत त्रिपिंडी श्राद्ध करू नये. अगदीच अपरिहार्य असेल, उदा. एक मंगलकार्य झाल्यावर पुन्हा काही महिन्यांच्या अंतराने दुसरे मंगलकार्य होणार असेल, तर त्या दोन कार्यांच्या मध्यंतरी त्रिपिंडी श्राद्ध करावे.

 विधी करण्यास योग्य स्थाने:

त्र्यंबकेश्वर, गोकर्ण महाबळेश्वर, गरुडेश्वर, हरिहरेश्वर (दक्षिण काशी), काशी (बनारस) ही स्थाने त्रिपिंडी श्राद्ध करण्यासाठी योग्य आहेत. तसेच हा विधी नदी किंवा खाडी, समुद्र किनारी करायला हारकत नाही.

पद्धत:

प्रथम तीर्थात स्नान करून श्राद्धाचा संकल्प करावा. नंतर महाविष्णूची व श्राद्धासाठी बोलावलेल्या ब्राह्मणांची श्राद्धविधीप्रमाणे पूजा करावी. त्यानंतर यव, व्रीही आणि तीळ यांच्या पिठाचा प्रत्येकी एकेक पिंड तयार करावा. दर्भ पसरून त्यावर तिलोदक शिंपडून पिंडदान करावे.

यवपिंड (धर्मपिंड) : पितृवंशातील व मातृवंशातील ज्या मृतांची उत्तरक्रिया झाली नाही, संतती नसल्याने ज्यांचे पिंडदान केले गेले नाही किंवा जन्मतःच जे आंधळे-पांगळे होते (आंधळे-पांगळे असल्याने लग्न न झाल्याने संततीरहित), अशा पितरांचे प्रेतत्व नष्ट होऊन त्यांना सद्गती मिळण्यासाठी यवपिंड देतात. याला धर्मपिंड असे नाव आहे.

मधुरत्रययुक्त व्रीहीपिंड : पिंडावर साखर, मध व तूप एकत्र मिसळून घालतात, त्याला मधुरत्रय असे नाव आहे. हा दिल्याने अंतरिक्षात असलेल्या पितरांना सद्गती मिळते.

तीलपिंड : पृथ्वीवर क्षुद्रयोनीत राहून इतरांना पीडा देणार्‍या पितरांना तीलपिंडाने सद्गती प्राप्त होते.

या तिन्ही पिंडांवर तिलोदक द्यावे. त्यानंतर पिंडांची पूजा करून अर्घ्य द्यावे. श्रीविष्णूसाठी तर्पण करावे. ब्राह्मणभोजन घालून त्यांना दक्षिणा म्हणून वस्त्र, पात्र, पंखा, पादत्राण इत्यादी वस्तू द्याव्यात.

श्राद्धकर्त्याच्या पत्रिकेत पितृदोष असेल, तर तो दोष घालवण्याच्या उद्देशाने त्याने आई-वडील जिवंत असतांनाही हा विधी करावा.

श्राद्धकर्त्याचे वडील जिवंत नसतील, तर त्याने विधी करतांना केस काढावेत. वडील जिवंत असणार्‍या श्राद्धकर्त्याने केस काढण्याची आवश्यकता नाही.

 त्रिपिंडी श्राद्धात श्राद्धकर्त्यालाच अशौच असते, घरातील इतरांना नाही. त्यामुळे घरातील एखादी व्यक्ती विधी करत असतांना इतरांनी पूजा वगैरे करणे बंद करण्याची आवश्यकता नाही.

Reviews

There are no reviews yet.

Be the first to review “त्रिपिंडी श्राद्ध”

Your email address will not be published. Required fields are marked *